दारुत रंगला अन् संसार भंगला..!*
व्यसनमुक्ती केंद्रासाठी हवं प्रभावी विधेयक; धुमसणाऱ्या रागाचा अखेर झाला उद्रेक*
31 July, 2025
दि.२९सातारा ( ज्ञानेश्वर भोईटे):-दारुत रंगला, संसार भंगला, संसार उध्दवस्त करी दारु, बाटलीस स्पर्श नका करु, असा संदेश देत 'वारी व्यसनमुक्ती'ची या अभिनव उपक्रमाची सुरुवात काही वर्षापूर्वी कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्ती संघाने सुरु केली. व्यसनमुक्त चळवळ पुढे गावगाडयातही जोमाने राबविली. पण समाजाने वेळीच त्याच आत्मचिंतन केले नाही. अखेर त्याचे दुष्परिणाम म्हणजे पाटण तालुक्यातील सवारवाडी येथील उमद्या वयापासूनचा तरुण पुढे चाळीशीनंतरही दारुच्याच आहारी राहीला. सतत दारुत रंगलेल्याचा संसार अखेर त्याच्या मृत्यूनंतरच भंगला. या घटनेनंतर हे संपूर्ण कुटुंब उध्दवस्त झाल्यामुळे समाजमनातुन हळहळ व्यक्त होत आहे.
सवारवाडी ता. पाटण येथे शनिवार, दि. २६ जुलै रोजी पती सतत दारुच्या नशेत असल्याने त्रस्त झालेल्या कुटुंबीयांनी त्याला या व्यसनामधून बाहेर पडता यावे. यासाठी लाकडी दांडक्याने पहाटेच्यावेळी घरातील सदस्यांनी मारहाण केली. त्या मारहाणीत अगोदरच दारुच्या नशेत तर्रर असणाऱ्याची एव्हाना प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे घाव वर्मी लागल्याने रक्तस्त्राव होवून रमेश कोंडीबा खरात वय ४५ याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस तपासात आलेले मुद्दे अन दारुचे दुष्परिणाम यावर गेल्या चार दिवसांपासून एकच चर्चा सुरु आहेत.
*लग्नानंतरही दारुचे व्यसन सुरुच..*
पाटण तालुक्यातील कडवे बुद्रुक अंतर्गत सवारवाडी हे गाव डोंगराळ भागात आहे. या सवारवाडीत कसंबसं सात ते आठ लोकवस्ती आहे. रमेश खरात यांना वडिलोपार्जित थोडंस शेत आहे. पण त्यावर आर्थिक ताळमेळ बसत नसल्याने मिळेल ते काम करु लागला. पण मिळालेल्या मजूरीतून हाती आलेल्या पैशातुन सुरुवातीला मौजमस्ती म्हणून दारु घेवू लागला. याच दरम्यान, लक्ष्मी यांच्याशी विवाह झाला. या विवाहानंतर दारुचे व्यसन सुरुच होते. सुरुवातीला वाटले आज, उद्या यामधून पती रमेश हा बाहेर पडेल, अशी मनाची समजूत घातली. पण ती फोल ठरली. आता निसर्गनियमानुसार या संसारवेलीवर नवीन दोन पक्ष्यांचे आगमन झाले. संसार बहरत चालला होता. पण दारुचे व्यसन चालूच होते.
*आई, मुलाने सांभाळला अर्थकारणाचा ताळमेळ...*
एव्हाना मुले मोठी झाली. मुलगी अश्विनी अन मुलगा हरिष आता करिअर शोधू लागली. याच दरम्यान, नागठाणे ता. सातारा येथे नात्यातील उमेश शिंदे यांच्याबरोबर मुलगी अश्विनी हिचे लग्न लावून दिले. तिला आता दोन वर्षाचा मुलगा आहे. पण गेल्या सात ते आठ महिन्यापूर्वी नियतीच्या मनात दुसरेच काही तरी होते. त्यामुळे मुलगी अश्विनी हिचा पती उमेश शिंदे याला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. ही मुलगी या घटनेनंतर सासरी नागठाणे येथेच राहयला आहे. पण अधूनमधून माहेरी येत असत. अन घटनेच्या दिवशीही माहेरी होती. मुलगा हरिष हा मालिकेच्या सेटवरील मिळेल ते काम करु लागला होता. त्यामुळे या कुटुंबात हरिष याचा वडिल दारुच्या व्यसनाधिनतेत अडकला असला तरी अर्थकारणाचा ताळमेळ आई अन मुलगाच सांभाळत होते.
*मारहाणीत रक्तस्त्राव झाल्याने रमेशचा मृत्यू...*
रमेश खरात हे दिवसभर केलेल्या मजूरीतून आलेल्या पैशातून दारुच्या गुत्यावर जात असे. दैनंदिन हा नित्यक्रम असे. घरी आल्यानंतर घरात चिडचिडीचा पाढा असायचाच. आता या बाबीला कंटाळलेली पत्नी लक्ष्मी, मुलगा हरिष याने रमेशला आपल्या कुटुंबात काही तरी भीती असावी म्हणुन लाकडी दांडक्याने पहाटेच्यावेळी बडबड करायला लागल्यानंतर मारहाण केली. सतत दारुच्या नशेत तर्रर असलेल्या रमेशची प्रकृती बेताचीच झाली होती. प्रतिकारशक्ती कमीच असल्याने या मारहाणीत घाव वर्मी लागल्याने त्यामध्येच रमेशचा मृत्यू झाला. या घटनेवेळी मुलगी अश्विनी उमेश शिंदे वय २४ रा. नागठाणे ता. सातारा ही तिथेच होती. आता या घटनेनंतर भानावर आलेले कुटुंब हतबल होवून एकमेकांकडे पाहत प्रश्नांची उत्तरे शोधू लागली. एव्हाना ही बाब कोणीतरी एकाने डायल ११२ ला कळविली. यानंतर उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि रविंद्र भोरे हे आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेत घटनास्थळी येऊन तपासाची दिशा ठरवू लागले.
*पोस्टमार्टम अहवालानंतर खूनाचा गुन्हा...*
खुनाच्या घटनेनंतर सर्व शक्यता तपासता जोपर्यंत पोस्टमार्टमचा रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत माहित असुनही खुनाचा गुन्हा दाखल केला नव्हता. कारण मारहाणीच्या भीतीपोटी कदाचित ह्रदय अचानकपणे बंद पडले असेल का? या ही शक्यता विचारत घेतल्या जात होत्या. पण पीएम रिपोर्टमध्ये मारहाणी दरम्यान रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याचा अहवाल आला. यानंतरच अखेर पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यामुळे आता माहेरी आलेल्या मुलीला आता कायद्याच्या मांडवाखालून जाण्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही. या सर्व घटनेमध्ये आता या दारुच्या व्यसनापायी हे संपूर्ण कुटुंबच उध्दवस्त झाले आहे. रमेश खरात याचे वडील मेंढपाळाचा व्यवसाय करत असल्यामुळे ते फिरतीवरच असल्याने या खरात कुटुंबीयांच्या घराला आता कुलुपच लावावे लागले.
*व्यसनाला जबाबदार कोण?*
दारुच्या व्यसनाचा अंत मृत्यूमध्ये झाला. या घटनेला जन्मदाते जबाबदार की, त्याची पत्नी कि, मुलं की, समाज हा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे. पण भविष्याचा विचार करता व्यसनमुक्ती केंद्रासाठी लोकप्रतिनिधींनी प्रभावी विधेयक आणणे हे आज काळाची गरज बनली आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्यांची मनस्थिती नेमकी कशी बदलते? या विषयावर मानसोपचार तज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले की, जागतीक आरोग्य संघटनेच्या मते व्यसनाच्या आहारी जाणे हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. जो मेंदूमधील पेेशींना व्यसनाच्या पदार्थाची सवय लागायला लागते. साधारणपणे शंभर जणांमधील बारा ते १५ जण हे पूर्णपणे व्यसनाच्या आहारी जात असतात. त्यामुळे पुन्हा-पुन्हा व्यसन हे करावेसे वाटते. दारु जर घेतली नाही तर त्या व्यक्तीचे अंग थरथरायला लागते. याचवेळी मुळच्या कामाकडेही दुर्लक्ष होते. दारु घेणे अन त्या प्रभावातून बाहेर येणे यामध्येच माणूस अडकायला लागतो. त्यामुळे त्याचे सर्व आयुष्यावर दारुचेच कंट्रोल चालायला लागते. त्यामुळे या दारुपायी त्याचे कुटुंबही उध्दवस्त होत असतात. अनेकदा या दारुमुळे प्रतिकारशक्ती कमी होवून मृत्यूच्या दारात तो जात असतो.
*व्यसनी व्यक्तीला हवं समुपदेशन...*
व्यसनी व्यक्तीला दारुच्या नशेतून बाहेर पडण्यासाठी समुपदेशन होणे गरजेचे आहे. कारण दारुच हा एक दीर्घ मुदतीचा आजार आहे. हा आपल्या समाजाने अजूनही म्हणावं तसं स्विकारलेला नाही. ब्लड प्रेशर, डायबेटीस हे आजार झाले तर यामधून बाहेर पडण्यासाठी दीर्घकाळ झगडावे लागते. व्यसनामध्ये काही लोकांना वाटते की, जादूची कांडी आपणाला मिळावी अन ती लावून आपला रुग्ण दुरुस्त व्हावा, अशी अपेक्षा असते. हाच मुळात गैरसमज आहे. दारुड्या मुलाचे लग्न झाल्यानंतर तो सुधारेल असं वाटतं. वास्तविक पाहिलं तर या लग्नाचा अन व्यसनी व्यक्तीचा कोणताही दुरान्वये संबंध नाही. दारु पिणाऱ्या व्यक्तीच लग्न म्हणजे आगीतून उठून फुफाटयात जाण्याचाच प्रकार आहे. अशा व्यक्तीच लग्न करायचं असेल तर व्यसनमुक्तीच्या उपचारानंतर पुढे एक दोन वर्षे दूर राहिल्यानंतरच लग्न करणे हे कुटुंबाच्या हितावह ठरु शकते.
*व्यसनविरोधी औषधे संमतीविना दिल्यास कायद्याने गुन्हा*
व्यसनाधीनतेपासून दूर राहण्यासाठी दिली जाणारी औषधे हे संबंधित व्यक्तीला सांगुन देणेच हितावह आहे. अन्यथा अनेकदा त्याला जेवणातून औषध दिले तर त्याचे दुष्परिणाम म्हणजे रक्तदाब वाढणे, हार्टॲटक येणे यासह इतर बाबी एैरणीवर येवून त्याला घातक ठरु शकते. त्यामुळे व्यसनी व्यक्तीला दिली जाणारे औषधे हे त्याच्या संमतीशिवाय दिली तर कायद्यान्वये हा गुन्हाच ठरु शकतो. एका बाजूला शासन लाडक्या बहिणींना मदत करते अन दुसऱ्या बाजूला समाजातील दारुची उपलब्धता वाढवत आहे. व्यसनापासून दूर राहण्यासाठी कुटुंबियांना समुपदेशनाची तितकीच गरज आहे. पण शासनाची अशी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही, हेच मोठं दुर्देव आहे.
सातारा जिल्ह्यात दारुबंदीची चळवळ जावळी तालुक्यात झाली आहे. दारुबंदीच यश हे मर्यादेपर्यत येवू शकते. पण त्यासाठी दारु उपलब्धता कमी करणे, अन त्याबरोबरच व्यसनमुक्तीच्या सुविधा उपलब्ध करणे हे दोन्ही पातळीवर ज्यावेळी होईल त्याचवेळी जिल्हा व्यसनमुक्त होवू शकेल.
.................................
*व्यसनमुक्ती केंद्रात पंधरा हजाराहून अधिक रुग्ण बरे*
साताऱ्यातील व्यसनमुक्ती केंद्र हे डॉ. नरेंद्र दाभोळकर, शैला दाभोळकर यांनी १९९१ मध्ये सुरु केले. या तीस पस्तीस वर्षामध्ये पंधरा हजाराहून अधिक रुग्ण उपचार घेवून बरे झाले आहेत. सातारा जिल्ह्यात व्यसनमुक्त होणारांचे प्रमाण हे ५0 ते ६0 टक्के आहे. जगभरातील टक्केवारीही अशीच आहे. या व्यसनमुक्त केंद्रात सांगली, कोल्हापूरसह मुंबई येथून लोक उपचारासाठी येत आहेत.
...................................
*व्यसनमुक्ती केंद्रे गावपातळीवर हवीत*
व्यसनमुक्त केंद्रामध्ये प्रतिमहा तीसहून अधिकजण उपचारासाठी येत असतात. दारुच आजार हा मुळातच दीर्घमुदतीचा आहे. पण उपचार वेळेत मिळाला तर ५0 ते ६0 टक्के लोक यामधून बाहेर पडत असतात. यासाठी सतत पाठपुरावा कुटुंबियांचा आवश्यक असतो. आज ज्या सुविधा व्यसनमुक्ती केंद्रात दिल्या जातात. तशाच सुविधा जिल्ह्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रातून गावपातळीवर पथदर्शी प्रकल्प केला आहे. यामध्ये अशा सुविधा अनेक गावांमधून दिल्या तर निश्चितच विपरीत होणाऱ्या घटना टळू शकतात.
*-डॉ. हमीद दाभोळकर, मानोसोपचार तज्ञ सातारा.*
..................................
*दारु दुकानांना परवानगी देणाऱ्या सरकारचा व्यसनमुक्तीचा सल्ला निरर्थक*
देशाला महासत्ता बनविणारे 'युवाभारतचे स्वप्न २0२0 साला पर्यंत आपण पाहिले पूर्ण झाले की नाही हा चिंतनाचा विषय आहे. आता विकसित भारत २0४७ चे स्वप्न आपणाला दाखविले गेले आहे.पण ज्या पध्दतिने दारू व अंमली पदार्थांची उपलब्धतता पाहिली तर २0४७ पर्यंत विकसित भारत होइल का नशाबाजांचा देश होईल यावर चिंतन होणे गरजेचे आहे. दारूच्या व्यसनाधिनतेमुळे कुटुंब व्यवस्थाच उध्वस्थ होत असून अनेक दुर्देवी घटना घडत आहेत. सरकारने महसुला पेक्षाही व्यसनांमुळे लोकांचे बिघडणारे आरोग्य, हत्या,आत्महत्या,अपघात याचा विचार करायला हवा. राज्याचे मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री अनेक सभांमधून तरूणांना व्यसनमुक्त रहाण्याचा सल्ला देत आहेत पण दारूची दुकाने दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांचा सल्ला निरर्थक ठरणारा आहे.
*- विलासबाबा जवळ, व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र*