मेडिकल कॉलेजचे नाव छत्रपती संभाजी महाराज असल्यामुळे या मेडिकल कॉलेजमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा
साताऱ्यातील मेडिकल कॉलेजसाठी २८३ कोटीचा निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा-सामाजिक कार्येकर्ते व पत्रकार सुरेश बोतालजी
08 July, 2025
साताऱ्यातील मेडिकल कॉलेजसाठी २८३ कोटीचा निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा-सामाजिक कार्येकर्ते व पत्रकार सुरेश बोतालजी
सातारा दि .९ :-छत्रपती संभाजी महाराज मेडिकल कॉलेज बांधकामाचा पहिला टप्पा पूर्णपणे पार पडला असून न्याती सारखी नावाजलेली बांधकाम क्षेत्रातील कंपनी या मेडिकल कॉलेजचे बांधकाम करत आहे. तसेच कॉलेजचे नाव छत्रपती संभाजी महाराज मेडिकल कॉलेज असे असल्यामुळे या कॉलेजमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुरेश बोतालजी यांनी सातारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले असून मेडिकल कॉलेजला तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीअजितदादापवार तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना अर्जाद्वारे मेल करण्यात आलेला आहे दि. 16 ते 18 जुलै २०२५ च्या दरम्यान प्रत्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून समक्ष मागण्यांसंदर्भात निवेदन देणार आहे असे निवेदनात म्हटले आहे.
देशातील सर्वात मोठे वैद्यकीय महाविद्यालय साताऱ्यात होत असून, जिल्ह्याच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील ही ऐतिहासिक घटना आहे. या छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे मेडिकल कॉलेज भविष्यात सुपरस्पेशालिटी सेवा देणारे वैद्यकीय केंद्र ठरणार असून, जिल्ह्याच्या आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षणाच्या विकासात क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे. या कॉलेजच्या इमारत बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्याचे काम गतीने सुरू आहे. वेळेपूर्वीच साताऱ्याचे वैद्यकीय महाविद्यालय बारा वर्षांपूर्वी मंजूर झाले. मात्र, राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे प्रत्यक्ष बांधकामाचा मुहूर्त मागील दोन-तीन वर्षांपूर्वी लागला. साताऱ्यासोबत राज्यात मंजूर झालेली इतर मेडिकल कॉलेजेस बांधून त्यामध्ये मेडिकलचे विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले असताना साताऱ्यात मात्र सरकारी उदासीनता आणि राजकारण यामुळे या मेडिकल कॉलेजला सुरुवातीला अनेक अडचणी आल्या.
जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतल्यानंतर कॉलेजची जागा ताब्यात मिळून त्यावरची अतिक्रमणे हटवण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. मात्र, त्यातही सरकारकडून मंजूर झालेला निधी वेळोवेळी उशिरा मिळत गेला. मात्र तरीही हे काम गतीने पूर्ण करण्यात येत आहे. मेडिकल कॉलेज बांधकामाचा पहिला टप्पा पूर्णपणे पार पडला आहे. 'न्याती'सारखी नावाजलेली बांधकाम कंपनी या मेडिकल कॉलेजचे बांधकाम करत आहे. पहिल्या या टप्प्यातील काम पूर्ण झालेले आहे.सिव्हिल बांधकामाची कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहेत. या टप्प्यांतर्गत ३७० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह, ६०० हुन अधिक विद्यार्थी क्षमतेचे स्वयंपाकगृह व डायनिंग हॉल, स्टाफसाठी चार स्वतंत्र इमारती, कॉलेज अधिष्ठात्यांचे निवासस्थान तसेच शवागृह व ओटोपी इमारत यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्धारित वेळेत पहिला टप्पा पूर्ण केला आहे.
जिल्ह्याच्या वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने ही महत्त्वाची कामगिरी ठरली आहे. आता दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. अडीच वर्षांत हा टप्पा पूर्ण करण्यासाठी २९१ कोटी निधीची आवश्यकता आहे.
मार्च महिन्यात या टप्प्याचे काम सुरू झाले असून ते ३० टक्केहून अधिक पूर्ण करण्यात आले आहे. हे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याची मुदत असली तरी पुढील आठ महिन्यांत ते पूर्ण करण्यात येणार आहे. तसे झाले तर २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षातील भावी डॉक्टरांची बॅच शिक्षण घेण्यासाठी ही इमारत सज्ज झाली आहे. मेडिकल कॉलेजचे काम वेगाने सुरू आहे, मात्र निधी उपलब्ध होण्यासअडचण येत आहे.राज्य शासनाकडून निधी वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे त्याचा कामाच्या गतीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
सार्वजनिक बांधकाम मंडळ तसेच आरोग्य विभागाने समन्वय साधत मेडिकल कॉलेजचे काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. निधी वेळेवर मिळाल्यास निश्चितपणे हा प्रकल्प वेळेआधी पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यासह राज्यातील हजारो विद्यार्थी, डॉक्टर्स यांना दिलासा मिळणार असून सामान्य रुग्णांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधांचा लाभ होणार आहे. सातारा जिल्हा हा वैद्यकीयदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकत असून जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद व आशादायक बाब आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांची सातारा ही चौथी राजधानी असून अशा राजधानीमध्ये छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून या महाविद्यालयांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी राज्यशासनाकडे आम्ही करीत अआहोत ,त्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी तसेच वैद्यकीय महाविद्यालयास राज्य शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुरेश बोतालजी यांनी केलेली आहे मागणी मान्य न झाल्यास दिनांक 15 ऑगस्ट रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनतेच्या हितासाठी आंदोलन करणार असल्याचे पत्रकात बोतालजी यांनी पत्रकात म्हटले आहे.