वडूज जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपअभियंता सत्यवान सानप यांची नियुक्ती
खटाव तालुक्यातील विकासकामांंना मिळणार गती
23 June, 2025
खटाव :दि.२३:-वडूज जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाला अखेर पूर्णवेळ अधिकारी म्हणून सत्यवान सानप मिळाले आहेत. याच कार्यालयात गेल्या चार वर्षांपासून शाखा अभियंता म्हणून ते कार्यरत होते, पडळ येथील सुपुत्र असलेले सत्यवान विष्णू सानप यांची वडूज बांधकाम उपविभागाचे उपअभियंता पदी नियुक्ती झाल्याने, रखडलेल्या प्रशासकीय कामाला आता गती मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे. गेल्या दीड वर्षांत या पदावर तब्बल पाच वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी तात्पुरता पदभार सांभाळला. यामध्ये दहिवडी आणि फलटण येथील अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला होता. एका अधिकाऱ्याकडे तर सेवानिवृत्तीला अवघे चार दिवस शिल्लक असताना चार्ज दिला गेल्याने प्रशासकीय कामकाजाचा पूर्णपणे बोजवारा उडाला. कर्मचाऱ्यांना एका सहीसाठी ५० किलोमीटर दूर फलटणला जावे लागत असल्याने तेही हैराण झाले होते.
या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, सत्यवान सानप यांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ते स्थानिक असून त्यांना कार्यालयाची आणि तालुक्यातील समस्यांची पूर्ण जाण आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा मुख्यालयातही १२ वर्षे सेवा बजावली आहे. त्यांच्या रूपाने एक अनुभवी आणि पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने, खटाव तालुक्यातील विकासकामांनाचालना मिळेल, आणि विकासकामांना गती येईल, सानप यांच्या नियुक्ती मुळे खटाव तालुक्यातील राजकीय नेते, कार्यकर्ते मित्रपरिवार अभिनंदन करीत असून शुभेच्छा चा वर्षा होत आहे, एक चांगला अधिकारी मिळाला अशी भावना येथील जनता व्यक्त करीत आहे. या त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज मॅडम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.