single-post

देव्हाऱ्यात नको, डॉक्टरांना जेलमध्ये ठेवा*

समाजात तीव्र प्रतिक्रिया : वैद्यकीय व्यवसायाची प्रतिमा डागळणाऱ्या डॉक्टरांचे करायचे काय?- विनोद कुलकर्णी पत्रकार

26 July, 2025

सातारा:-साताऱ्यातील डॉक्टरांना नेमके झालय तरी काय, असा प्रश्न पडावा, अशा घटना दर दोन ते चार दिवसाला सामोरे यायला लागल्या आहेत. वैद्यकीय व्यवसायाविषयी आधीच समाजामध्ये वेगवेगळ्या कारणाने नकारात्मक भावना आहेत. त्यात अशा घटना वैद्यकीय व्यवसायाची प्रतिमा डागळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत आहेत. महिलांविषयी डॉक्टरांच्या गैरवर्तनाच्या भूमिकेने समाज हादरुन गेला आहे. ज्यांना आपण पूर्वी देव्हाऱ्यात ठेवत होतो, त्या डॉक्टरांना जेलमध्ये ठेवायची वेळ आली आहे. समाजात अतिशय तीव्र भावना आहेत. अन्याय होत असेल तर जरुर वेगवेगळ्या संघटनांनी त्यांची पाठराखण केली पाहिजे. मात्र, तेच अन्याय करत असताना डॉक्टरांच्या संघटना मुग गिळून गप्प बसतात, यासारखे दुसरे दुर्दैव नाही.
माणसातला देव पहिल्यांदा समाज डॉक्टरांमध्ये बघतो. आता मात्र बघत होता, असे म्हणायची वेळ आली आहे. आम्ही वैद्यकीय व्यवसायांमध्ये सुधारणा व्हावी, डॉक्टरांनी आपली प्रतिमा बदलावी यासाठी सतत जागरुकता म्हणून लेखन करतोय. आधीच कट प्रॅक्टीस आणि नको त्या दरपत्रकामुळे वैद्यकीय व्यवसायाची विश्वासहर्ता संपत चालली आहे. डॉक्टर हे लुटमारच करतात, अशी समाजभावना बनत चालली आहे. त्यामुळे ती प्रतिमा बदलण्यासाठी नेमके काय काय करता येईल याचा विचार वैद्यकीय व्यवसायिकांनी आणि तिच्या संघटनांनी केला पाहिजे.
उलट हल्ली काही संघटना कायदेशीर धाक दाखवणाऱ्या नोटीसा पाठवून सुधारणांना विरोध करताना दिसत आहेत. आम्ही ज्या गोष्टी मांडतो त्या सर्वसामान्य जनतेच्या मनातील प्रातिनिधीक भावना आहेत. आठवड्याला एका डॉक्टरवर विनयभंग आणि महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचे गुन्हे दाखल व्हायला लागले तर त्याविषयी बोलायचे आणि लिहायचे नाही का?, वैद्यकीयच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रातील अशा प्रवृत्ती समोर यायला लागल्या तर आम्ही अन्याय दूर व्हावा, समाज प्रबोधन व्हावे, अशा भूमिकेतून लेखन करतच राहण्याची भूमिका घेणार आहोत. चुकीच्या कोणत्याही भूमिकेला आमचा पाठींबा असणार नाही. समाजजागृती करण्याचे व्रत आम्ही जोपासतच राहणार आहोत.
कराडमध्ये एका डॉक्टरने बेधुंद वाहन चालवत दोन ते तीन जणांना उडवले. गेल्या दोन दिवसात माण तालुक्यातील एका डॉक्टरने एका महिलेचा विनयभंग केला तर कोरेगाव तालुक्यातील डॉक्टरने एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर अत्याचार केला.

अशा घटना सतत सामोरे येतात आणि संपूर्ण वैद्यकीय व्यवसायावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. वैद्यकीय व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांचे आहे. मात्र, त्या भूमिकेपासून वैद्यकीय व्यवसायातील घटक आता दूर जाताना दिसत आहे.
आम्ही प्रतिष्ठीतच आहोत आणि आमच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आणि आम्हाला अटक झाली तरी कोणी काही बोलायचे नाही. अगदी ब्र ही आमच्या व्यवसायाविषयी आणि आमच्या कामाविषयी कोणी बोलायचा नाही, या मानसिकतेतून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांनी बाहेर आले पाहिजे. आपण स्वत:ला आपल्या व्यवसायाविषयी प्रश्न विचारला पाहिजे. मटका घेणारा, जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांना नैतिकता शिकवता येत नाही. मात्र, ज्या व्यवसायाचा संपूर्ण पाया नैतिकतेवर उभा आहे. त्या व्यवसायातील नैतिकतेच्या गोष्टी किमान निदर्शनास आणून दिल्या तर त्याविषयी आम्ही जागृत होवू, आम्ही आमच्यात सुधारणा करु, आम्ही बदल करु, अशी भूमिका का घेतली जात नाही. प्रत्येक चुकीच्या गोष्टीचे समर्थन का केले जाते, असा प्रश्न बुध्दीवंत आणि सर्वसामान्य जनतेला पडल्याशिवाय राहत नाही.
वैद्यकीय हा जरी आता व्यवसाय म्हणून समाजाने स्वीकारला असला तरी समाजातील काही लोकांकडून नैतिकतेने वागण्याच्या समाजाच्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची पूर्ती एखाद्या वेळेस झाली नाही तर त्याकडे दुर्लक्ष करता येते. मात्र, त्या घटकातील काही लोकांकडून सतत अशा गोष्टी घडत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. नैतिक आणि अनैतिकतेच्या पलिकडे जावून काही डॉक्टर जर वागत असतील तर त्यांना त्या व्यवसायातून बाजूला ठेवले पाहिजे. त्यांचा व्यवसायाचा परवाना रद्द केला पाहिजे. मात्र, उलट त्या व्यवसायातले लोक किंवा आमचे व्यवसायबंधू कसे बरोबर आहेत आणि पोलीस ठाण्यात जावून गुन्हा दाखल करणाऱ्या व्यक्ती कशा चुकीच्या आहेत, याचे धडे सर्वांना देत बसतात.
धुर येतोय म्हणजे कुठेतरी आग लागली आहे, हे निश्चित आहे. आग न लागता धूर येत नाही. ज्या घटना समोर आल्या आहेत त्या घटना बघता काहीतरी चुकीचे घडल्याशिवाय महिला पोलीस ठाण्यात जावून आपल्यावरील अन्याय मांडणार नाहीत. भारतीय महिला या आपल्या प्रतिष्ठेला फार महत्त्व देतात. बऱ्याचवेळा अन्याय झाला तरी त्याची वाच्यता कोठेच करायची नाही, अशी त्यांची भूमिका असते. अन्याय सहन करु. पण, प्रतिष्ठेला आणि प्रतिमेला धक्का लागू नये याची काळजी त्या घेत असतात. मात्र, ज्याअर्थी त्या पोलीस ठाण्यात जावून आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडत आहेत त्यावरुन त्यामध्ये सुकृतदर्शनी तथ्य असणारच आहे, असे गृहित धरायला हवे. अन्यायाचा कडेलोट झाल्याशिवाय त्या पोलीस ठाण्यात जाणार नाहीत हे वास्तवही स्वीकारायला हवे.
सर्वसामान्य संशयित आणि हायफ्रोफायला संशयित असा भेद पोलिसांना आणि न्यायव्यवस्थेला करता येत नाही. प्रथमदर्शनी कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता पोलिसांनी केलीच पाहिजे. सर्वसामान्य संशयिताला जो न्याय लावला जातो, तोच न्याय हायफ्रोफाईल संशयितालाही लावला पाहिजे, अशी अपेक्षा समाजाची आहे आणि त्याच अपेक्षेचा पाठपुरावा आम्ही करतोय. त्यात काही गैर आहे, असेही आम्हाला वाटत नाही. पोलिसांच्या तावून सलाखून केलेल्या तपासातून एख़ाद्या डॉक्टर निदार्ेष असल्याचे सिध्द झाले तर त्याचे समर्थनच आम्ही करणार आहोत. कोणत्याही डॉक्टरवर खोटे, निराधार आणि बिनबुडाचे आरोप होत असतील तर तेही चुकीचेच आहे. जे डॉक्टर खरोखरच निदार्ेष असतील आणि तसे पुरावे त्यांनी पोलिसांकडे आणि न्यायव्यवस्थेकडे दिले तर आम्ही त्यांचीही पाठराखण करु आणि त्यांच्या बाजूने म्हणजेच पर्यायाने न्यायाच्या बाजूने आम्ही उभे राहण्यात कमी पडणार नाही. मात्र, ज्या महिला अन्यायग्रस्त आहेत, त्यांच्या न्यायाचा विचार आधी केला पाहिजे. ज्या घटकांना न्याय मिळण्याची गरज आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आपली घटना आणि व्यवस्था दुर्बलांच्या बाजूने उभी राहणारी आहे. दुर्बलांना न्याय मिळावा यासाठी निर्माण झालेली आहे. सर्वजण समान पातळीवर आहेत, अशा भूमिकेतून तिची रचना झाली आहे.
हायप्रोफाईल संशयितांना वेगळा न्याय आणि सामान्यांना वेगळा न्याय, अशी भूमिका पोलिसांनाही घेता येणार नाही. डॉक्टर असो वा कोणत्याही क्षेत्रातील बडा संशयित असो कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्याला अटक करुन ताब्यात घेतले पाहिजे आणि चौकशीअंती तो निदार्ेष असेल तर तसे आरोपपत्र दाखल करताना तो निदार्ेष असल्याचे प्रमाणपत्र देवून त्याला सोडले पाहिजे.
डॉक्टरांनी आपल्या वर्तनात सुधारणा करण्याची गरज आहे. चार-दोन डॉक्टर असे वागले म्हणजे सगळेच डॉक्टर वाईट आणि चुकीचे आहेत, असा दावा कोणीही करणार नाही. मात्र, ज्या क्षेत्राची पूजा करायची त्यांच्यावरच महिलांच्या गैरवर्तनाचे आरोप होत असतील तर त्याच्याविषयी खुलेपणाने चर्चा करणे गरजेचे आहे. त्यातून दोष दूर करावेत, असा हेतू आहे. वैद्यकीय व्यवसायातील कुप्रवृत्ती ठेचून बाहेर काढाव्यात हा हेतू आहे. संपूर्ण वैद्यकीय व्यवसाय स्वच्छ, पारदर्शक आणि नैतिकतेने चालावा हा हेतू आहे. मात्र, सगळे डॉक्टर नैतिकतेने वागतात, अशी भूमिका कोणीही घेवू नये. कारण, फिर्यादीला वेगवेगळी अमिषे दाखवून फिर्याद मागे घेण्यासाठी कसा दबाव टाकला जातो, याच्याही घटना समाजाला माहित असतात. सगळेच धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत, असा गैरसमज कोणी करुन घेवू नये. आरोप झालेल्या दहा डॉक्टरपैकी एखादा डॉक्टर स्वच्छही असू शकेल. मात्र, एक स्वच्छ आहे म्हणजे बाकीच्या नऊ जणांना निदार्ेषत्व बहाल करा, अशी भूमिका चुकीची आहे.

डॉक्टरांकडे येणारा समाज हा अपेक्षेने आलेला असतो. वैद्यकीय सेवा देणे, ही आपली जबाबदारी आहे. त्या प्रती सजग राहून डॉक्टरांनीही स्वत:साठी लक्ष्मणरेषा घालून घ्यावी. प्रामाणिक, स्वच्छ, निष्कलंक असे काम केले पाहिजे. प्रत्येकाने व्यवसायाशी प्रामाणिक राहून काम केले पाहिजे. वैद्यकीय शिक्षणात नैतिकता, आर्थिक नियोजन याचेही धडे दिले पाहिजेत.

- डॉ. भास्कर यादव

..............................
डॉक्टर पेशासाठी चुकीच्या घडणाऱ्या घटना अत्यंत क्लेषदायक आहेत. डॉक्टर हा समाजातील आदरणीय व्यवस्था असून, डॉक्टरांनी नितीमत्ता सांभाळली पाहिजे. अशा घटना वारंवार घडल्यामुळे समाजामध्ये संभ्रमाचे, संशयाचे वातावरण निर्माण होते. या घटनांचा तपास पोलीस यंत्रणांनी पारदर्शक करावा. तसेच न्यायालयाने हे खटले फास्ट ट्रॅक्टच्या धर्तीवर चालवून त्यातील सत्य लवकर समाजासमोर आणावे.

- डॉ. प्रताप गोळे

....................
सध्या सर्वच स्तरातून समाज जीवनात नीती, नियमानुसार वागण्याचा आग्रह कमी होताना दिसत आहे. खेदाची गोष्ट म्हणजे वैद्यकीय क्षेत्र हे देखील त्याला अपवाद राहिलेले नाही. वैद्यकीय शिक्षणात मेडिकल एथिक्स हा विषय शिकवणे अनिवार्य करणे आवश्यक वाटते.

- डॉ. हमीद दाभोलकर

....................
समाजातील विकृतींना कडक शासन झालेच पाहिजे. डॉक्टर म्हणून समाजात चांगली प्रतिमा आहे. डॉक्टरकीचे शिक्षण देताना नितीमूल्ये शिकवली जातात. डॉक्टरांनी सेवाभावी वृत्तीने काम करावे. सध्या डॉक्टरी पेक्षा कॉपार्ेरेट होवू लागला आहे. कॉपार्ेरेट हॉस्पिटल वाढत चालले असून, वैद्यकीय पेशाकडे उद्योग/ व्यवसाय म्हणून पाहिले जाते. शासनाने कॉपार्ेरेट हॉस्पिटल ताब्यात घेवून ती स्वत: चालवावीत. अन्यथा वैद्यकीय सेवा महागड्या होतील. या क्षेत्रात समाजाशी नाळ जोडलेले डॉक्टर आणि कॉपार्ेरेट डॉक्टर अशी दुफळी होत आहे. समाजानेही दोघांना एका चष्म्यातून पाहू नये.

- डॉ. प्रशांत पन्हाळकर

.....................
डॉक्टर हा माणूसच आहे. त्यांच्याकडे बघण्याची नजर समाजाने योग्य ठेवावी. डॉक्टर हे रुग्णाला बरे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतात. डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले तरी ते कोणत्या हेतूने केले आहेत, याचा तत्काळ तपास केला जावा.

- डॉ. पल्लवी साठे- पाटोळे

..........................
डॉक्टरांकडून चुकीचे प्रकार होण्यामागे लाखो रुपयांचे डोनेश भरुन घेतलेले शिक्षण आहे. डोनेश घेणाऱ्या कॉलेजमुळे वैद्यकीय व्यवसायात दुकानदारी सुरु झाली आहे. पैसेवाले, डॉक्टरांचीच मुले डॉक्टर होत आहेत. गुणवत्तेशिवाय वैद्यकीय कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू नयेत. पैसेवाल्यांच्या बाजूनेच न्याय, कायदा उभा राहतो. त्यामुळे कोणतेही कृत्य केले तरीही हे पैसेवाले मॅनेज करुन त्यातून बाहेर पडतात. डॉक्टरांचे चुकले तर माणसाचा जीव जातो. डॉक्टरांची शपथ त्यांच्यासाठी कायदा असला पाहिजे. शासनाची धोरणे लोकहिताची नाहीत म्हणूनच अनेक चुकीचे प्रकार घडूनही त्यावर कठोर कारवाई होत नाही.

- ॲड. वर्षा देशपांडे

..............................
देवानंतर दुसऱ्या स्थानावर डॉक्टरांना मानले जाते. ती प्रतिमा सदैव ठेवण्यासाठी डॉक्टरांनी आपले चारित्र्य जपले पाहिजे. काही हॉस्पिटल, डॉक्टरांकडून आर्थिक बिले, कधी तरी चुकीचे उपचार यामुळे डॉक्टरांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलत आहे. त्यात अशा घटना घटने निंदनीय आहे. डॉक्टरांनी आपली प्रतिमा जपावी. नैतिकता आणि सामाजिक भान सांभाळून डॉक्टरांनी रुग्णसेवा करावी.

- ॲड. चंद्रकांत बेबले

..........................
डॉक्टरांनी वैद्यकीय कायद्यानुसारच काम करावे. नियमबाह्य काम करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होईल, असे शासकीय धोरणे असावीत. डॉक्टरांवर खोटे गुन्हे दाखल होवून, त्यातून नाहक बदनामी होवू नये. तसेच जे गुन्हे दाखल होतील, त्यातील वास्तविकता, सत्य पोलिसांनी तपासून ते न्यायालयात मांडावे. जे सत्य आहे, त्याला न्याय मिळावा.

- ॲड. नितीन शिंगटे

...........................
डॉक्टरांना समाज देव मानतो. परंतु, बहुतांश डॉक्टरांना मानवतावादी दृष्टीकोनाचा विसर पडला आहे. डॉक्टर मनी माईंडेड होत असल्याने रुग्णसेवा ही भावना हरवत चालली आहे. आर्थिक दुर्बलांसाठी वैद्यकीय सेवा दुरापास्त झाली आहे. डॉक्टरांनी मानवतावादी दृष्टीकोनातून उपचार केल्यास चुकीचे प्रकार घडणार नाहीत. तसेच समाजामधील त्यांचा आदर कायम राहिल.

- प्रा. मृणालिनी आहेर

..........................
काही डॉक्टरांनी चुकीचे प्रकार केले तरी त्याचे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रावर परिणाम होवू नयेत. जे चुकीचे आहे, ते समाजासमोर यावे. गुन्हा दाखल झाला म्हणजे डॉक्टर चुकीचे आहेत अथवा फिर्यादी चुकीचा आहे, असा कयास कोणीही बांधू नये. जे सत्य आहे, ते पोलीस व न्यायालयीन यंत्रणेने समाजासमोर आणावे.

- सुनील जगताप

.........................