शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष बिनविरोध निवड
शशिकांत शिंदे यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रसह सातारा जिल्ह्यात आनंद उत्सव साजरा
15 July, 2025
मुंबई दि.१५: मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यात माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांतजी शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी बैठकीत प्रस्ताव एकमतानं मंजूर झाला,वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या या बैठकीला शरद पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी अनिल देशमुख यांनी नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर हा प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आला. त्यानंतर शरद पवार यांनी पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली.
शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.शशिकांत शिंदे म्हणाले की, “मला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी देण्यात आल्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच मी महाराष्ट्रातील जनतेला ग्वाही देतो की राज्यातील प्रत्येक प्रश्नांना आणि अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करेन. तसेच पक्ष संघटना राज्यात सगळीकडे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेन. पक्षात अनेक जेष्ठ नेते असतानाही मला प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली, या संधीचं १०० टक्के सोनं करण्याचा मी प्रयत्न करण्याचं काम करणार आहे” असं शशिकांत शिंदे म्हणाले.सामान्य कुटुंबातील व्यक्ती नेता कसा होतो, हे आर. आर. पाटलांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. जनतेच्या प्रश्नांसाठी आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात मी आवाज उठवेन. तसेच वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात जनजागृतीही करेन," अशी ग्वाही शशिकांत शिंदे यांनी दिली.पूर्वीच्या राजकारणाची आणि आताच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. हल्ली सत्ताबदल हा सत्तेच्या माध्यमातून आमिष दाखवून केला जातो. हे आपल्यापुढचे पहिले आव्हान आहे. या सर्व बदललेल्या यंत्रणेला लोकांपर्यंत पोहोचवून जागृत करेन आणि सर्वसामान्य जनतेसाठी काम करेन. महिन्याभरात मी राज्याचा दौरा करेन, पक्षसंघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करेन. नवीन तरुणांना संधी देईन. सर्वधर्मीय तरुणांना एकत्र करुन संघटना मजबूत करेन," असे वचन शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिले.
शशिकांत शिंदे हे शरद पवारांचे विश्वासू, माथाडी चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व…शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाल्यानंतर पक्षाने कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर ही धुरा देण्यात आली आहे.
आगामी होत असलेल्या महाराष्ट्रातील नगर पालिका, महानगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत.याच पार्श्वभूमी वर आक्रमक अभ्यासू चेहरा म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांची महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बदल होणार असल्याचे संकेत दिले होते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्रातील नेते शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर सोपवली आहे. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेते असलेल्या शशिकांत शिंदे यांना महाराष्ट्रासह राज्यभरात पक्षांचे संघटन वाढवण्याची जबाबदारी असणार असून नगरपालिका महानगरपालिका तसेच स्थानिय स्वराज्य संस्थांच्या निवडणूकां जिंकून देण्याची जबाबदारी असणार आहे ही जबाबदारी ते पाडतील अशी खात्री महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना वाटत आहे.
शशिकांत शिंदे यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९६३ रोजी झाला असून ते जावळी तालुक्यातील हुमगावचे रहीवासी आहे. त्यांना माथाडी कामगार चळवळीतील प्रभावशाली नेते म्हटले जाते. कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट असलेले शशिकांत शिंदे हे तरुण वयापासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव जयवंतराव आणि आईचे नाव कौशल्या आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार गटाचे नवीन प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांचा अत्यंत विश्वासू साथीदार म्हटले जाते. शशिकांत शिंदे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोरेगांव विधानसभा मतदार संघात सक्रीय असून ते दोनदा आमदार झालेले आहेत.
लोकसभेत उदयनराजे विरोधात लढले, विधानसभेत थोडक्यात पराभव झाला १९९९ मध्ये शिंदे यांनी जावळी विधानसभा मतदार संघातून आपली पहिली आमदारकीची निवडूक जिंकली होती. त्यांनी कृष्णा खोरे जलसिंचन महामंडळात जल संधारण मंत्री म्हणून काम केले आहे.२००९ ते २०१४ दरम्यान शशिकांत शिंदे कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. त्यांनी शालिनीताई पाटील यांना हरवले होते. ते दोन वेळा जावळी आणि दोनदा कोरेगावमधून आमदार म्हणून निवडून आले.२०१९ मध्ये शिंदे यांचा महेश शिंदे यांच्याकडून पराभव झाला. तर २०१९ मध्ये सातारा लोकसभा मतदार संघातून त्यांनी उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढवली त्यातही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.२०२४ मध्ये शशिकांत शिंदे यांचा विधानसभेतही पराभव झाला. सध्या विधान परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसेचे ( शरद पवार गट ) मुख्य प्रतोद असून आता प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्यावर नविन जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सातारा जिल्हा व कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये शशिकांत शिंदे यांच्या निवडीमुळे नवचैतन्य, निर्माण झालेले आहे.